हर्णेत डाॅल्फिनच्या मृत्यूचे गुढ वाढले; महिन्याभरात सापडला तिसरा मृत डाॅल्फिन

दापोली:- तालुक्यातील हर्णे नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडला आहे. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा अशाप्रकारे डॉल्फिन मासा मृत होऊन समुद्रकिनारी सापडणं याच नेमकं कारण वनविभागाने शोधून काढणं गरजेच आहे. वारंवार हे असे डॉल्फिन माशांच्या बाबतीत होत असल्यामुळे निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.

दापोली तालुक्यातील सालदुरे,पाळंदे येथे समुद्र किनारी गेल्या काही दिवसांपूर्वी एक मृत डॉल्फिन सापडला होता ही बाब ग्रामस्थांनी पत्रकार व वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा केला व मृत डॉल्फिनला समुद्रकिनारी खड्डा करून पुरून टाकले ही घटना ताजी असतानाच रविवारी ३ मे रोजी दुसऱ्या एका डॉल्फिनचा मृतदेह समुद्रातून वाहून येऊन किनार्‍याला पडलेला आढळून आला. एकाच आठवड्यात दोन डॉल्फिनचा एका समुद्रकिनारी मृत्यू ओढवल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. या डॉल्फिनला देखील कुजलेल्या अवस्थेत असल्याने तेथेच खड्डा काढून पुरला. काही दिवसांपूर्वी गुहागर येथील समुद्र किनारी देखील मृत डॉल्फिन सापडला होता.

परंतु आता एकाच महिन्यात केवळ २० दिवसांनी पुन्हा एकदा हर्णे नवानगर येथे मृत अवस्थेत डॉल्फिन सापडला. दापोली तालुक्यातली या दोन महिन्यातली मृत डॉल्फिन किनाऱ्यावर सापडण्याची ही तिसरी घटना आहे. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच हा डॉल्फिन किनाऱ्याला लागला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. सदरचा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हजर राहून पंचनामा करून ताबडतोब ग्रामस्थांच्या मदतीने तिथेच पुळणीत खड्डा काढून पुरला.

परंतु हे डॉल्फिन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत याचा ठोस शोध लावून डॉल्फिन मृत होण्याचे कारण समोर आणणे गरजेचे बनले आहे. यावेळी हर्णे परिसरातील ग्रामस्थ, सर्पमित्र – प्रितम साठविलकर, दापोली वनाधिकारी , कर्मचारी – श्रीम.जगदाळे मॅडम, आदी उपस्थित होते.