रत्नागिरी :-सुधारित नळपाणी योजनेच्या नवीन मुख्य जलवाहिनीच्या चाचणीचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शीळ येथे झाला. त्यामुळे 51 टक्के पाण्याची गळती बंद झाली आहे. उच्च दाबाने पाणीपुरवठा होणार असून मुख्य पाण्याची टाकी काही तासात भरणार आहे. मंगळवार (ता. 26) पासून शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
शहरातील पाणीटंचाईचे संकट आता कायमचे दूर होणार आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेमधील शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार फुटत होती. सुमारे 51 टक्के गळती होती. त्यामुळे शहराला अपेक्षित पाणीपुरवठा होत नव्हता. नागरिकांची ओरड होती म्हणून नवीन मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. या कामात अनेक अडचणी आल्या; मात्र मंत्री उदय सामंत आणि नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. लॉकडाऊनमुळे 60 दिवस काम बंद होते. परंतु साळवी यांनी दिवसरात्र एक करून हे काम पूर्ण करून घेतले.
ना. सामंत यांच्या उपस्थितीत आज जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली. 100 टक्के ही चाचणी यशस्वी झाली. किरकोळ 1 ठिकाणी गळती होती तिही काढण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, पाणी सभापती विकास पाटील, निमेश नायर, बाळू साळवी, तुषार साळवी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सावंत आदी उपस्थित होते.
पाणी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष बंड्या साळवी अहोरात्र मेहनत घेत होते. एसीमध्ये बसून काम करण्याऐवजी स्वतः दिवस-रात्र कामाच्या ठिकाणी लक्ष ठेवून होते. त्यांना मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरेंचीही चांगली साथ मिळाली. त्यामुळे या दोन्ही अधिकार्यांचे काम कौतुकास्पद आहे, अशी शाबासकीची थाप मंत्री उदय सामंत यांनी दिली.