जिम सुरु करण्याबाबत शरीरसौष्ठव संघटनेकडून ना. सामंतांना निवेदन

रत्नागिरी:- लाॅकडाऊनकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जिम व्यवस्थापनाकडून प्रशासनाला सहकार्य करत जीम व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवला. परंतु आता सुमारे 2 महिन्यांनतर जिम व्यवसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे काटेकोर पालन करून जिम सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

शारिरीक तंदुरूस्तीसाठी व्यायामाची नितांत आवश्यकता त्याचा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोलाची मदत होते. सद्या कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी देखील व्यायाम करा व तंदुरूस्त राहण्याचा सल्ला दिला जात आहे.पण या कोरोना काळात व्यायाम व खेळाविषयी जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीबाबत या संघटनेतर्फे निवेदनाद्वारे कैफियत मांडण्यात आलेली आहे. कोरोनासारख्या आजाराच्या काळात प्रत्येक स्त्री-पुरूषाला व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायाम नसेल तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाऊन त्यांना आजारांचा सामना करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे मानसिक, आर्थिक व शारिरीक नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येते.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जिम व्यवस्थापनाकडून लाॅकडाऊनच्या काळात प्रशासनाला योग्य पकारे सहकार्य करून जीम व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.रत्नागिरी शहरात तसेच ग्रामीण भागात चिपळूण, खेड,दापोली, गुहागर, संगमेश्वर, मंडणगड, लांजा, राजापूर या तालुक्यात जिमची संख्या मोठी आहे. त्यामुळे फिटनेस ट्रेनर व त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न आहे. आज जिम बंद होऊन दोन महिने होऊन गेलेत. जिल्ह्यातील काही जिम प्रत्येकाच्या मालकीच्या तर भाड्याच्या जागा घेऊन चालवणार्‍यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे जिम व्यवसायिकांचे मोठे आार्थिक नुकसान झालेले आहे. काही जिम कर्ज घेऊन सुरू करण्यात आलेल्या असल्याने त्या कर्जाची परतफेड करण्यासमोरही आर्थिक प्रश्न उभा आहे.

जरी जिम पुढे सुरू झाल्यातरी सुमारे 7 ते 8 महिने आर्थिक संकटाना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आर्थिक संकटात सापडलेल्या या व्यवसायाला शासनस्तरावरून अनुदान मिळावे अशी मागणी जिल्हा हौशी शरीर शौष्ठव संघटनेकडून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली असल्याचे संघटनेचे कार्यवाह शैलेश जाधव यांनी सांगितले आहे. जिम सुरू करताना जिममध्ये बॅचेस पाडण्यात येतील. एका वेळेस 5 ते 10 व्यक्तीला अंतर ठेवून व्यायाम करायला लावण्यात येईल. तोंडाला मास्क लावणे,मशिन सॅनिटायझरने स्वच्छ करण्याची खबरदारी, व्यायाम करणार्‍यांना जास्तीत जास्त 45 मिनिट व्यायाम करायला देण्यात येईल, अशाप्रकारे अनेक नियमांचे पालन करून जेणेकरून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी काळजी घेतली जाईल असेही या संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.