जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा पोलिसावर हल्ला

रत्नागिरी:-रत्नागिरी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने कारागृहातील पोलिसावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटना २३ मे रोजी सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी कारागृहात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयसिंग पुंजाजी सोळंके हे जिल्हा विशेष कारागृहात पोलीस हवालदार म्हणून गेली ३ वर्ष कर्तव्य बजावत आहेत. २३ मे रोजी सकाळी ०८.२५ वा.चे सुमारास जिल्हा विशेष कारागृहात कर्तव्य बजावत असताना  यातील शिक्षा बंदी एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असून तो सी.बी.डी पोलीस ठाणे , गुन्हा रजि.नं. ७५/२००८ , भा.दं.वि.सं. ३०२ मधील ठाणे जिल्हा सत्र न्यायालय , समरी केस नं . ४६५/२००८ मध्ये जन्मठेप शिक्षा बंदी म्हणून जिल्हा विशेष कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याला ठेवण्यात आलेल्या सर्कल नं . ०३ मधून तो बाहेर येवून सर्कल नं . ०२ समोर विनापरवाना फिरत असताना त्याला  सोळंके यांनी हटकले असता ,त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तू शिवीगाळी करु नकोस , ” असे समजावून सांगत असताना तोसोळंके यांच्या  अंगावर धावुन गेला. त्यांच्या सरकारी गणवेषाची गळपट्टी धरुन शर्टाचे बटन तोडून सोळंके यांच्या कानाजवळ फाईट मारुन त्यांना नखाने ओरबोडून दुखापत केली.तसेच सोळंके यांच्या हातातील सरकारी काठी हिसकावून घेवून त्या काठीने मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी विजयसिंग पुंजाजी सोळंके यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी सदर शिक्षा बंदीच्या विरोधात भा.द.वी.क.३५३,३३२,३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.