गुरख्यांची घरवापसी लांबणार; युपीसह नेपाळच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी:- आंबा हंगामासाठी कोकणात आलेल्या गुरख्यांना नेपाळला जाण्यासाठी आंतर्देशीय परवानगीसह आंतरराज्य प्रवासासाठी पास घ्यावा लागणार आहे. उत्तरप्रदेशला जाणार्‍या हजारो कामगारांना अद्याप तिकडून हिरवा कंदिल मिळालेला नसल्याने गुरख्यांच्या प्रवास भविष्यात खडतर होण्याची शक्यता आहे. हंगाम संपायला अजून पंधरा दिवसांचा कालावधी आहे. जिल्ह्यात सुमारे दहा हजाराहून अधिक गुरखे दाखल झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जानेवारीत आलेले गुरखे आंबा हंगाम संपल्यानंतर जुनमध्ये नेपाळला परतात. सध्या कोरोनामुळे देशाच्याच नव्हे तर आंतरराज्य सिमाही बंद आहेत. या प्रवासासाठी शासनाची परवानगी अत्यावश्यक आहे. त्याचा परिणाम कोकणात आंबा हंगामात रोजगारासाठी गुरख्यांचा परतीचा मार्गावर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध राज्यातून कामासाठी थांबलेल्या कामगारांना परतीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली आहे. परजिल्ह्यात जाण्यासाठी 55 हजार लोकांनी नोंदणी आहे. त्यात उत्तरप्रदेशचे सुमारे पाच हजार कामगार आहेत. त्यांना परतीसाठी अद्यापही तेथील सरकारकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही.

गुरख्यांना नेपाळला जाण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये प्रवेश करावा लागेल. रेल्वेने जायचे असेल तर लखनौपर्यंत गाडीची व्यवस्था होईल. तिथून पुढे नेपाळ बोर्डरपर्यंत बसेसशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या परिस्थितीत लखनौवरुन पुढे जाण्याची हमी उत्तरप्रदेश सरकारला घ्यावी लागेल. लखनौवरुन गौरीफंटाला जाण्यासाठी सिमेपर्यंत जाण्यास रेल्वे नसल्यामुळे तो प्रवास अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. हंगाम संपला की हे नेपाळी खासगी बसेस करुन नेपाळला रवाना होतात. गतवर्षी खासगी बसेसमधून एका प्रवाशाला 2500 रुपये घेतले जातात. खासगी बसेसला नेपाळमध्ये जाण्यासाठी सुमारे 1800 किलोमीटर अंतर पार करावे लागते. त्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्याच धर्तीवर गुरख्यांसाठी एसटी प्रशासनाकडून जादा पैसे घेऊन व्यवस्था केली तर गुरख्यांचा प्रवास सुकर होईल आणि ते नेपाळला पोचतील. अन्यथा त्यांचा प्रवास खडतरच होणार आहे. यंदा गुरख्यांचा प्रवास सुकर झाला नाही, तर ते पुन्हा पुढील हंगामात येणार नाहीत अशी भिती काही आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

ऑनलाईन नोंदणी अत्यावश्यक आंतरराज्य आणि आंतरदेशीय परवान्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु आहे. अद्यापही नेपाळ देशाची परवानगी प्राप्त झालेली नाही. तसेच उत्तरप्रदेशचीही परवानगी नाही. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत प्रयत्न सुरु आहेत. त्यापुर्वी गुरख्यांची महाराष्ट्र शासनाच्या लिंकवर परतीच्या प्रवासासाठी नोंद करणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नाही.