रत्नागिरी :- कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक पराज्यातील कामगार गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत असून अनेक सरकारी कामांसाठी कामगार शोधण्याची वेळ आली आहे. तुर्भे येथून मालगाडीतून आलेले खत उतरवण्यासाठी कामगारांची जुळवाजुळव करावी लागली आहे.
कोरोनाच्या टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांची गैरसोय झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात विविध कामांसाठी झारखंड, कर्नाटक, उत्तरप्रदेश यासह विविध राज्यातील कामगार एसटी, रेल्वेस्थानकावर अवजड वस्तू उतरवण्यासाठी ठेकेदारांकडे कार्यरत आहेत. ही कामे करण्यासाठी स्थानिक कामगारांचा समावेश अत्यंत कमी आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून परराज्यात जाणार्यांची संख्या चाळीस हजारावर पोचली आहे. त्यातील काही कामगार निघूनही गेले आहेत. त्याचा फटका रेल्वे स्थानकावर उतरवण्यात येत असलेल्या अवजड वस्तूंच्या कामांना बसला आहे.
पावसाळी हंगामासाठी तुर्भे येथून हजारो टन खत रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मालगाडीतून पाठविले जाते. पहिली गाडी आली तेव्हा कामगार उपलब्ध होते; मात्र दुसरी गाडी दोन दिवसात सुमारे 2600 टन खत घेऊन येणार आहे. ते उतरवण्यासाठी कामगारांचा प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वेचे स्वतःचे सुमारे साठ कामगार उपलब्ध होते. या कामासाठी आणखीन 40 ते 50 कामगारांची गरज होती. यावर कृषी विभागाशी चर्चा झाल्यानंतर कामागारांची शोधाशोध सुरु झाली. परराज्यात जाणार्या कामगारांची यादी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यातील रत्नागिरीत असलेल्यांची नावे काढून या कामांसाठी विचारणा करण्यात आली. गावाकडे जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी कृषी विभागाच्या सुचनेला होकार दिला. त्यामुळे खत उतरवण्यासाठी कामगार उपलबध झाले आहे. पावसाचा हंगाम तोंडावर असल्यामुळे खत येत्या आठवडाभरात उपलब्ध होेणे गरजेचे आहे. पाऊस सुरु झाला की शेतकर्यांना खताचा तुटवडा भासू शकतो. हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून कसुन प्रयत्न सुरु आहेत. खत उतरवण्यासाठी रेल्वेचे काही कामगार उपलब्ध होते. त्यांना सुमारे चाळीस कामगारांची गरज होती. त्यासाठी जुळवाजुळव करावी लागली. ते कामगार मिळाले आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.