रत्नागिरी:- पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरी शहरवासीयांसाठी मोठी दिलासादायक बाब पुढे आली आहे. टंचाईच्या काळात शहरवासीयांना दरदिवशी मुबलक पाणी देण्याच्या वचनाची पूर्ती होत आहे. शीळ धरणाची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे पूर्ण झाल्याने दोन दिवसात शहरवासीयांना दिवसाआड नाही तर दररोज मुबलक पाणी मिळणार आहे. या जलवाहिनीचा शुभारंभ रविवारी ना. सामंत यांच्या उपस्थितीत होत आहे.
शहरामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. दररोज पालिकेवर पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेले नागरिक मोर्चा घेऊन येत होते. सत्ताधारी आणि पाणी सभापती त्यामुळे हैराण झाले होते. शीळ धरणातून येणारी मुख्य जलवाहिनी जीर्ण झाल्याने दबाव वाढल्यानंतर ती वारंवार फुटून पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता; मात्र नगराध्यक्ष बंड्या साळवी येणार्या नागरिकांपुढे वस्तुस्थिती पुढे ठेवत होते. ज्या ठिकाणी तांत्रिक दुरुस्ती आहे, ती तत्काळ दूर करून तात्पुरते समाधान केले जात होते. वारंवार उद्भवणार्या या परिस्थितीतून कायमची सुटका करून घेण्यासाठी शीळ धरणाची मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामावर जास्त भर देण्यात आला. सुधारित पाणी पुरवठा योजनेतून हे काम केले जात आहे. अनेक अडचणींवर मात करीत मंत्री उदय सामंत यांच्या पाठबळामुळे नगराध्यक्षांनी लॉकडाऊनच्या काळातही स्थानिक कामगारांना हाताशी धरून जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले. जीर्ण झालेली जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यात आली आहे. त्यामुळे साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील टाकी पूर्ण क्षमतेने भरून शहरवासीयांना मुबलक पाणी देणे शक्य होणार आहे.
पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन पालिकेने दोन महिन्यांपूर्वी दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारी कमी झाल्या. आता शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या दोन ते चार दिवसांमध्ये दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि नगराध्यक्ष साळवी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉपपर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे जॅकवेलमधील विद्युत पंपही 300 अश्वशक्तीचे बसविण्यात येणार आहेत. उच्च दाबाने पाणीपुरवठा होऊन साठवण टाक्या क्षमतेने भरणार आहेत. त्यामुळे दरदिवशी शहरवासीयांना मुबलक पाणी देता येणार आहे. शहरवासीयांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतोय यातच समाधान आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.