गुरखा मजूरांच्या परतीसाठी रेल्वे सोडण्याची बाळ माने यांची मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यात आंबा बागांच्या देखभाल, रखवाली व आंबा व्यवसायातील हंगामी कामासाठी नेपाळमधून आलेल्या हजारो गुरखा मजुरांसाठी मडगाव ते मथुरा अशी विशेष गाडी रेल्वेने चालू करावी. 7 जूननंतर गरजेनुसार गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपचे माजी आमदार श्री. बाळ माने यांनी रेल्वेमंत्री व कोकण रेल्वेचे सीएमडी यांच्याकडे केली आहे.

कोकणामध्ये हापूस आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. या बागांच्या आंबा व्यवसायातील विविध कामांसाठी हजारो मजूर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान कोकणात दाखल होतात. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांकडे पाच ते 15 एवढ्या संख्येने हे गुरखे कार्यरत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात 12 ते 15 हजार मजूर कार्यरत आहेत.कोरोना लॉकडाऊनमुळे या मजुरांना परत जाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. अनेक आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी त्यासंदर्भात श्री. बाळ माने यांच्याकडे मागणी केली. आंबा उत्पादक शेतकरी या नात्याने श्री. माने यांनी ही मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि कोकण रेल्वेचे सीएमडी यांच्याकडे केली. या संदर्भातील पत्र श्री. बाळ माने यांनी नुकतेच त्यांना पाठवले आहे.

दरवर्षी 31 मे ते 15 जून या कालावधीत हे सर्व मजूर कोकण रेल्वेने मथुरा रेल्वेस्थानकापर्यंत जाऊन तिथून बसने मायदेशी रवाना होतात. लॉकडाऊनमुळे या मजुरांना मथुरापर्यंत जाण्याकरिता विशेष रेल्वेची गरज आहे. 7 जूननंतर गरजेनुसार गाड्या सोडाव्यात यासाठी श्री. बाळ माने यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांनी आपल्याकडील मजूर लोकांची माहिती एकत्रितपणे करून श्री. बाळ माने यांच्याकडे पाठवावी, जेणेकरून प्रवासी मजुरांची यांची संख्या आणि सोडण्यासाठी आवश्यक रेल्वेगाड्या यांचे नियोजन करण्यासाठी सोपे होईल.