कोरोना बाधित क्षेत्र वगळून शेतकऱ्यांना शेती साहित्यासह अवजारे पुरवणार

रत्नागिरी:- कोरोना बाधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील अन्य सर्व भागातील शेतकर्‍यांना आवश्यक शेतीची साहित्य आणि अवजारे उपलब्ध करुन द्या अशा सुचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी कृषी समितीच्या बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

कृषी समितीची बैठक नुकतीच जिल्हापरिषदेत झाली. यावेळी मागील वर्षात झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. मार्च 2020 अखेरपर्यंत 98 टक्के निधी खर्ची पडल्याचे कृषी अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीच्या वातावरणातही कृषी अधिकार्‍यांनी तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहून जिल्हापरिषदेतर्फे आवश्यक अनुदानावरील साहित्य पोच केले; मात्र रेड झोनमधील शेतकर्‍यांना त्याचा लाभ घेता आलेला नव्हता. कृषी विभागाला 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 55 लाखाचा निधी मंजूर होता. त्यातून ताडपत्री, आंब्याचे ट्रे, फवारणी पंप यासह शेतीविषयक साहित्य अनुदानावर शेतकर्‍यांसाठी देण्यात येणार होते. त्यासाठीच्या याद्या मंजूर करुन ठेवण्यात आल्या होत्या. वस्तु खरेदी केल्या गेल्या. मात्र आयत्यावेळी कोरोनाने पाय पसरल्यामुळे वाटप करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावरही कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी मात करत काम केले. याबद्दल नाटेकर यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

या बैठीकीमध्ये येऊ घातलेल्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. पुढील वर्षात शेतकर्‍यांना आवश्यक शेतीची अवजारे तत्काळ उपलब्ध करुन द्या अशा सुचना नाटेकर यांनी केल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांचे अर्ज आले आहेत, त्याची छाननी करा आणि साहित्य मंजुर करा. तसेच अन्य शेतकर्‍यांचे अर्ज मागवून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवून द्या. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसेल तिथे वस्तूंचे वाटप सुरु करा. यंदा आर्थिक वर्षासाठी 50 लाख रुपये उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पाच लाखाचा कमी निधी मिळाला आहे. तसे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यासाठी 20 हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यातील दोन हजार मेट्रीक टन खत उपलब्ध आहे. तसेच सुमारे तीन हजार मेट्रीक टन बियाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आवश्यक खतसाठा येत्या दोन दिवसात मिळेल असा विश्‍वास कृषी अधिकार्‍यांनी दिला.