कोरोना तपासणी लॅब जिल्हा रुग्णालयात उभारणार: ना. सामंत

रत्नागिरी :- कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आवश्यक असणारी लॅब खासगी रुग्णालयात उभारण्यापेक्षा जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यासाठी सुमारे 1 कोटी 7 लाखाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला लवकरच सादर केला जाईल. आठ ते पंधरा दिवसात लॅब उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न आहेत. भविष्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे उपस्थित होते. 
ते म्हणाले, जिल्ह्यात वालावलकर रुग्णालयामध्ये कोरोना नमुने टेस्टची लॅब उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र कोरोनाचे संकट संपल्यानंतर त्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल, की नाही माहिती नाही. त्यानंतर टेस्टसाठी शुल्क देखील आकारले जाईल. म्हणून आम्ही निर्णय बदलला आहे. नमुने तपासणीची ही लॅब शासनाच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातच उभारल्यास त्याचा सर्वाना आणि दुरगामी फायदा होईल. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाने 1 कोटी 7 लाखाचा हा प्रस्ताव तयार केला आहे.  

जिल्हा रुग्णालयात आधीच काहीसा ढाचा (स्ट्रक्चर) तयार आहे. त्यामुळे ही यंत्रणा उभारण्यात सोपे जाणार आहे. यासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही. जिल्हा नियोजन, खासदार, आमदार निधी त्यासाठी दिला जाईल. मात्र येत्या आठ ते 15 दिवसात लॅब उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या लॅबमध्ये मलेरियापासून इतर साथिच्या रोेगांची तपासणी देखील करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील सर्व समान्य लोकांसाठी ही शासनाची यंत्रणा कायमची उपयोगात येणार आहे. तसेच जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूरीसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे. आदीच ही लॅब उपलब्ध असल्याने मेडिकल कॉलेज मंजूरीला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून जिल्हा रुग्णालयात ही लॅब उभारण्याचे आम्ही निश्‍चित केले आहे. त्यासाठी 10 रुम तयार आहेत. मायक्रो बायोलॉजिस्ट लागतो तेही उपलब्ध करून दिले जाईल,  असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.