1 जूनपासून कोरे मार्गावर तीन गाड्या धावणार

रत्नागिरी:- चौथा लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील तिन गाड्यांचा समावेश असून त्या 1 जुनपासून धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्य तपासणी यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जाणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वे मंत्रालयाने ट्वीटरवरुन जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार देशभरात शंभर गाड्या धावणार आहेत. गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ कोरोनातील टाळेबंदीने रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या ही वाहतूक सुरु करण्याचा निर्णय झाला असून त्याचे नियोजन काटेकोरपणे करावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने मार्गदर्शक सुचनाही जाहीर केलेल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या तिन गाड्यांमध्ये मंगला, नेत्रावती आणि दुरांतो एक्स्प्रेसचा समावेश आहे.

या गाड्यांची तिकिटे फक्त आयआरसिटीसीच्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. रेल्वेस्थानकावरील आरक्षित खिडकीवर तिकिटे उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले आहे. आरक्षित केलेले तिकट कन्फर्म असेल त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवासासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व प्रवासी मास्क घालूनच प्रवेश करतील. रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रवाशांची तपासणी केली जाणार असून त्यासाठी गाडीच्या वेळेपूर्वी नव्वद मिनिटे आधी प्रवाशांनी स्थानकावर पोचणे आवश्यक आहे. स्थानकावरही सोशल डिस्टीन्सिंग ठेवणे बंधनकारक राहणार आहे. आरोग्य विषयक सर्व सुचनांचे पालन करणे अत्यावश्यक असून आरोग्य तपासणीत कोरोनाशी निगडीत लक्षणे किंवा तापमान आढळून आल्यास प्रवास करण्यास अनुमती दिली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक सुविधा त्या-त्या रेल्वेस्थानकांवर उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. जाहीर केलेल्या सर्व गाड्या त्यांच्या नियमित वेळेवरच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.