रत्नागिरी आगारातून एकही बस सुटली नाही कारण…

रत्नागिरी:- लॉकडाऊनमध्ये बंद असलेली एसटी वाहतूक शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात लांजा, देवरुख, चिपळूण आणि गुहागर आगारातून एसटी बसेस सुरू झाल्या मात्र रत्नागिरी आगारातून सकाळपासून एकही बस सुटलेली नाही. 22 प्रवासी उपलब्ध झाल्यावरतीच बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा बोर्ड झळकवण्यात आल्याने रत्नागिरी आगारातून शुक्रवारी सकाळ पासून एकही बस सुटू शकली नव्हती.

लॉकडाऊन नियमांमध्ये २२ मे पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले. यात जिल्हांतर्गत बससेवा तसेच रिक्षा यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे. प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बस सेवा सुरु करता येईल असे स्पष्ट करण्यात आले. यानुसार एसटी प्रशासनाने नियोजन करत रत्नागिरी आगारातून ग्रामीण भागात दररोज 52 गाड्या सोडण्याचे निश्चित केले आहे. 

मात्र शुक्रवारी रत्नागिरी आगारातून एकही बस धावली नाही. रत्नागिरीतुन दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट 22 प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येईल असा बोर्ड रहाटघर बसस्थानक येथे लावण्यात आला होता. या निर्णयाचा फटका रत्नागिरी आगारातून एकही बस सुटू शकली नाही.