महाआघाडी शासनाने महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडले: अॅड. पटवर्धन

रत्नागिरी:- आज भाजपाने राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाने राज्यशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, लांजा या चारही तालुक्यात व रत्नागिरी शहरात कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या प्रांगणात महाराष्ट्र बचाव आंदोलन करत राज्यशासनाचा निषेध करत कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले.

रत्नागिरी भाजपा कार्यालयाच्या प्रांगणात भा.ज.पा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत काळ्या फिती व राज्य सरकारचे धिक्कार करणारे हँन्ड बोर्ड घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी अॅड. बाबासाहेब परुळेकर, नगरसेवक- तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, बाबू सुर्वे, नगरसेवक राजू तोडणकर, सचिन वहाळकर, प्रशांत डिंगणकर, राजन फाळके, युवा मोर्चा अध्यक्ष व्ही.के.जैन, श्री.आयरे, श्री.बापट आदि कार्यकर्ते ही उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणा, अकार्यक्षमतेमुळे कोरोना संकटात सापडलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आल्यासारखी स्थिती आहे. जनतेला आरोग्य सुविधांचा बोजवारा, स्वॅब टेस्टिंग लॅब तसेच प्रशासकीय निर्देशांमध्ये गोंधळ, हातावर पोट असलेल्या तसेच परराज्यातील नागरिकांची परवड, अनिर्बंधपणे आलेल्या नागरिकांमुळे गावोगावी निर्माण झालेली भितीदायक वातावरण हे महाआघाडी शासनाच्या नाकर्तेपणाचे फलित आहे अशी खरमरीत टीका भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली.

रत्नागिरीतील कोरोना रुग्ण वाढत आहेत. आरोग्य सुविधा तसेच टेस्टिंग लॅब याबाबत महाआघाडी शासन कूर्मगतीने पुढे जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अन्य शहरातून नागरिक रत्नागिरीत येत असतांना त्यावर नियंत्रण नाही. सुविधांची वानवा असल्याने आलेले अभ्यागत आणि स्थानिक जनता या दोहोच्या आरोग्याबाबत गंभीर स्थिती झाली आहे, मात्र महाआघाडी शासनाला याबाबत जाग येत नाही. म्हणून महाराष्ट्र बचाव आंदोलन करून महाआघाडी शासनाला जागृत करावे यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन भाजपा करीत आहे असेही अॅड. पटवर्धन यांनी शेवटी नमूद केले.

दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात चारही तालुक्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन मोठ्या सहभागात करण्यात आले. रत्नागिरी शहरात अध्यक्ष सचिन करमरकर यांच्या नेतृत्वाखाली ७ नगरसेवक अन्य पदाधिकारी यांना बरोबर घेऊन २४ वॉर्डमध्ये हे आंदोलन झाले. रत्नागिरी तालुक्यात तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांच्या नेतृत्वाखाली ९० बुथवर २७० कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांसह हे आंदोलन केले. देवरुख येथे नगराध्यक्ष सौ.शेट्ये, श्री.प्रमोद अधटराव , लांजा येथे मुन्ना खांबकर, नगरसेवक लांजेकर, संजय यादव तर राजापूर येथे तालुकाध्यक्ष अभि गुरव नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आपापल्या प्रांगणात आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला.