बाजार समितीमध्ये ११ हजार ५४१ मेट्रिक टन आंब्याची विक्री

रत्नागिरी :- कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने आंबा विक्रीचा प्रश्न उद्भवला होता. कोकणातील एपीएमसी मार्केटवरच बहुतांश शेतकरी अवलंबून असल्याने स्थानिक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यत तीन हजार ८४७ डझन अर्थात ११ हजार ५४१ मेट्रिक टन आंब्याचा लिलाव  करण्यात आल्याने ११ लाख ७५ हजाराची उलाढाल झाली आहे.

जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती संजय आयरे, उपसभापती डॉ.अनिल जोशी यांच्या विद्यमाने लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. वाशी मार्केटमधील गडगडलेले भाव यामुळे शेतकर्‍यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली. लिलाव केंद्र उभारल्यानंतर दोन वर्षानी लिलाव सुरू झाला. पहिलेच वर्ष असून यावर्षी कमी आंबा उत्पादन असतानाही बाजारसमितीच्या आवारात शेतकºयांनी लिलावासाठी आंबा आणला होता.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून लिलाव सुरू झाला होता. आतापर्यत तीन हजार ८४७ डझन अर्थात ११ हजार ५४१ मेट्रिक टन आंब्याचा लिलाव झाल्याने ११ लाख ७३ हजार रूपयांचा व्यवसाय झाला आहे. वाशी, पुणे, अहमदाबाद येथील व्यापार्‍यांकडे रत्नागिरीतील सर्वाधिक आंबा पाठवला जातो. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्येच कोरोनाग्रस्त रूग्ण सापडल्याने मार्केटमधील खरेदी विक्री काही दिवस थांबविण्यात आली होती. यामुळे खासगी विक्रीवरही परिणाम झाला असल्याने दर गडगडले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या लिलाव प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. ८०० ते १२०० रूपये दर पेटीला सांगण्यात येत असल्याने शेतकºयांनी परवडत नसल्याचे सांगून लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे.