कोरोना तपासणी केंद्रासंदर्भात सद्यस्थितीचा अहवाल मंगळवार पर्यंत सादर करा


 उच्च न्यायालयाचे आदेश 

रत्नागिरी:- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी जाहीर केलेल्या यादीतील डेरवण येथील वैद्यकीय विद्यालयातील तपासणी केंद्र त्वरित चालू करा, याबाबत रत्नागिरीतील खलील वस्ता यांच्या वतीने ऍड. राकेश भाटकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने मंगळवारी सरकाने आपली बाजू मांडावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या संदर्भात तपासणी साठी कोकणातील वैद्यकीय यंत्रणेला मिरज येथील सरकारी तपासणी केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. अति कामाच्या व्यापामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पाठवलेले सर्व नमुने वेळेत तपासणी करून देण्यात मिरज सरकारी हॉस्पिटल असमर्थ असल्याचे यापूर्वी सांगितले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी जाहीर केलेल्या यादीतील डेरवण येथील वैद्यकीय विद्यालयातील तपासणी केंद्र त्वरीत चालू करण्यासाठी खलील वस्ता यांचे वतीने अॅड. राकेश भाटकर यांनी याचिका दाखल केली होती.

शुक्रवारी यावर मुंबई  उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जनहित याचिकेची सुनावणी झाली. सुनावणीवेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने 15 एप्रिल 2020 रोजी संबंधित वैद्यकीय तपासणी केंद्राचा संदर्भात पुरतता करण्याबाबत कळवले होते परंतु अद्यापपर्यंत त्यावर कारवाई न झाल्याने महाराष्ट्रातील 18 वैद्यकीय तपासणी केंद्रांबाबत योग्य ती पूर्तता करून सर्व कोरोना विषाणू तपासणी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी केली.
   

या सुनावणीवर उच्च न्यायालयाने रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या तपासणी केंद्रांची विचारणा केली असता रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात एकही तपासणी केंद्र नसल्याने सांगितले असता आश्चर्य व्यक्त केले. कोकणात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारला याबाबत माहिती घेऊन सद्यस्थितीचा आढावा मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
 कोकणवासीयांसाठी डेरवण येथे तरी कोरोना तपासणी केंद्र सुरू झाल्यास जलद तपासणी होऊन रूग्णांवरती वैद्यकीय उपचार लवकरात लवकर मिळू शकतील असे मत उच्च न्यायालयात मांडण्यात आले.