रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या काळात कोकणात अडकलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतू लागले आहेत. या मजुरांसाठी कोकण रेल्वे मार्गावर श्रमिक ट्रेन सुरू झाली असून गुरूवारी तिसर्या श्रमिक ट्रेनमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०१३ तर रत्नागिरी जिल्ह्यातून १५१ कामगार आपल्या गावी परतले आहेत.
लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुरूवारी तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील जबलपूरकडे रवाना झाली. रत्नागिरी जिल्ह्यातून १५१ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण १ ०१३ परप्रांतीय कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहर्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
यावेळी प्रवाशांना जिल्हा प्रशासनाच्यवतीने सर्व कामगार व मजुरांची रत्नागिरी रेल्वे स्थानकात वैद्यकीय तपासणी करुन पाण्याची बाटली, मास्क, साबण व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ९१० व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील १०३ व्यक्ती ५ पाच गाड्या अशा एकूण ५२ एस.टी बस मधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतुकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.