शिरगावमधील रस्ता रुंदीकरणाला मुहूर्त; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

रत्नागिरी:- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिरगाव वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ना. उदय सामंत यांनी कुशलतेने हा प्रश्न सोडवला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासन, पोलीस व शिरगांव-कासारवेली-काळबादेवी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव रस्ता रुंदीकरणाबाबत फेरसर्वेक्षण करण्यात आले होते. त्या पाहणीत अधिकाऱ्यांनी सुचविलेले पर्याय व ग्रामस्थांनी त्यासाठी दर्शवलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्नाबाबत प्रकर्षाने विचार सुरू झाला. म्हाडा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आमदार उदय सामंत यांनी या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येथील नागरिकांच्या पुढाकाराने समन्वय साधला होता. 
 

ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षा व्यक्त करत रुंदीकरणावेळी कोणत्याही ग्रामस्थांच्या एकही घर जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. रुंदीकरणासाठी 2 कोटीचे अंदाजपत्रक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आले होते.  शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच सौ. वैशाली गावडे यांनी हे काम मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता. इतर सर्व ग्रा.पं. सदस्यांच्या नेतृत्वाखाली तेथील संघर्ष समितीच्या पुढाकाराने बैठक घेण्यात येऊन चर्चा झाली.  त्यावेळी येथील ग्रामस्थही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी आग्रही झाले. त्यासाठी लगतच्या 17 बाधित रहिवाशांनीही समंती दर्शवली. बाधितांना पुन्हा बांधबंदिस्ती बांधकाम विभागाकडून करून दिली जाणार तसेच  मंजुर निधीतुन साडेसहा मीटर रूंदीचा रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे.