पावसाळ्याआधीच मिऱ्यावासीयांचा जीव टांगणीला

बंधारा दोन ठिकाणी गेला वाहून

रत्नागिरी:- मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधार्‍याची धूप काही थांबता थांबेना. समुद्राच्या उधाणामुळे भाटीमिर्‍या येथील बंधार्‍याचा काही भाग अलीकडे दोन ठिकाणी वाहून गेला आहे. या वाहुन गेलेल्या भागाची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती न केल्यास जवळच्या शेडमध्ये पाणी शिरण्याची भिती आहे. दुरूस्तीला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली असली तरी अजून पत्तनकडुन कामाला सुरवात झालेली नाही. त्यात वादळांचा इशारा आणि उधाणामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
बंधार्‍याच्या दुरूस्तीचे काम लवकरच सुरू करावे, यासाठी स्थानिक ग्रामस्थ जिल्हाधिकार्‍यांना भेटणार आहेत.

मिर्‍या धूप प्रतिबंधक बंधार्‍याची गेल्या दोन वर्षांमध्ये प्रचंड वाताहत झाली आहे. पंधरामाड येथील बंधार्‍याची उधाणाच्या भरतीत हानी झाली. येथील बंधार्‍यासह या भागातील पालिकेचा रस्ताच्या रस्ता वाहून गेला होता. अन्य ठिकाणीही बंधार्‍याला भगदाड पडले होते. समुद्राचे पाणी थेट रहिवाशांच्या कंपाऊंडमध्ये शिरले. समुद्राचे वाढते अतिक्रमणामुळे ग्रामस्थांनी गतवर्षी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले. नवीन मिर्‍या बंधार्‍यासाठी 190 कोटी मंजुर झाले. त्याचा सर्व्हे शासनाने नेमलेल्या एजन्सीकडून सुरू आहे. मात्र हा बंधारा पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार आहेत. नवीन बंधार्‍याचे काम पावसाळयानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. अशावेळी यंदाच्या पावसाळयात पुन्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पत्तनच्या अधिकार्‍यांनी मिर्‍या बंधार्‍याचा काही महिन्यांपूर्वी सर्व्हे केला. पत्तनच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी बंधार्‍यामधील धोकादायक ठिकाणे निश्‍चित केली. ज्या ठिकाणी बंधारा वाहून गेला आहे, अशी सात ठिकाणे आहेत. सात ठिकाणांच्या भरावासाठी 55 लाखांची आवश्यकता आहे. तर भाटीमिऱ्या येथील सनगरे यांच्या घरानजिक भराव टाकण्यासाठी स्वतंत्र 35 लाखाच प्रस्ताव तयार केला आहे. असा एकुण 90 लाखाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. 
अत्यावश्यक बाब म्हणून जिल्हा प्रशासनानेही दुरूस्तीला मंजूरी दिल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या अम्फान चक्रीवादळाचा किनारपट्टीला धोका आहे. तसेच उधाणाच्या भरतीमुळेही मिर्‍याबंधार्‍याचा हा उरलेला भागा वाहुन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्तन विभागाने पावसापूर्वी या बंधार्‍याची दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. लवकरच ते या मागणीसाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना भेटणार आहेत.