रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचे संदर्भात तपासणी अहवाल उशिराने येत असल्याने लवकरात लवकर तपासणी करून रुग्णांचे अहवाल मिळण्यासाठी व डेरवण येथील वैद्यकीय विद्यालयात तपासणी केंद्र चालू करण्यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये खलील वस्ता यांचे वतीने ॲडव्होकेट राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
कोकणामध्ये कोरोनाचा जलद गतीने फैलाव होत असल्यामुळे रत्नागिरीमध्ये तपासणी केंद्र चालू व्हावे याकरिता वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून मार्च महिन्यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे डेरवण हॉस्पिटलचे नाव पाठवण्यात आले होते. त्यावर परिषदेने संबंधितांना दिनांक 15 एप्रिल 2020 रोजी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी दिनांक 7 मे 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे अद्यापपर्यंत पूर्तता न झाल्याचे म्हटले आहे. अशी महाराष्ट्रातील एकूण 15 हॉस्पिटल संदर्भात पूर्तता करणे प्रलंबित आहे.
अशी परिस्थिती असताना कोकणामध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांचे नमुने मिरज येथील तपासणी केंद्रात पाठवले असता अति कामाच्या व्यापामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नमुने तपासणी करण्यास असमर्थता दर्शवली. त्या अनुषंगाने दिनांक 15 मे 2020 रोजी मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी नमुने घेण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे व आदेश पारीत केले आहेत. या पार्श्वभूमीवर अद्याप पर्यंत कोकणामध्ये तपासणी अहवाल याकरता मिरज येथील सरकारी तपासणी केंद्रावर अवलंबून राहावे लागत असल्याने श्री खलील वस्ता यांचे वतीने ॲडव्होकेट राकेश भाटकर यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली असून त्यावर शुक्रवार दिनांक 22 मे 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेची प्रत व नोटीस सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील यांना देण्यात आलेली आहे. याचिकेमध्ये रत्नागिरी तसेच महाराष्ट्रातील अन्य तपासणी केंद्रांच्या बाबतीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या अटींची पूर्तता करून लवकरात लवकर तपासणी केंद्र चालू करावीत अशी मागणी केली असून सरकारी तपासणी केंद्र मिरज यांनी तपासणी अहवालावर घातलेले निर्बंध त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्ते श्री खालील वस्ता तसेच ॲडव्होकेट राकेश भाटकर यांनी सदरची तपासणी केंद्रे त्वरित चालू झाल्यास लवकर अहवाल मिळून रुग्णांवर त्वरित उपचार चालू होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली