रत्नागिरी:- भाट्ये दर्गा येथे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करणार्या दुसर्या चालकाचा ट्रकखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किसन तानाजी दहिफले असे मृत चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरानजीकच्या एका कंपनीतून माल घेऊन हा ट्रक भिवंडी-ठाणे येथे जायला निघाला होता. या ट्रकमध्ये दोन चालक व एक क्लिनर असे तिघे होते. हा ट्रक भाट्ये कोहिनूर हॉटेल येथील उतार उतरून पुढे जात असताना भाट्ये दर्गा दरम्यान भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक रस्त्याकडेला कलंडला.
हा ट्रक रस्त्यावरून पलटी होऊन खाली जात असताना ट्रकमधील दुसर्या चालकाने आपला जीव वाचविण्यासाठी ट्रकमधून उडी मारली. मात्र ही उडी त्याच्या जीवावर बेतली. उडी मारणारा किसन तानाजी दहिफले हा ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात एवढा विचित्र होता ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात एक चालक व क्लिनर हे दोघे अडकून होते. हा ट्रक मुख्य रस्त्यावरून भाट्ये दर्गा येथील झाडीझुडूपातून पलटी होत वस्तीपर्यंत गेला. तेथील एका झाडावर आदळून ट्रक पलटी झाला तर झाडदेखील उन्मळून कोसळले असता हा ट्रक झाडाच्या बुंध्यात अडकला होता. ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले तर गुरूवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात यश आले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून या अपघाताची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.