रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या नियमांमध्ये २२ मे पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले. यात जिल्हांतर्गत बससेवा तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
तीन चाकी वाहन रिक्षा यामध्ये 1 वाहनचालक व 2 प्रवासी अशा मर्यादित प्रवासी सेवा सुरू करता येणार आहे. तसेच प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बस सेवा सुरु करात येईल.
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरू ठेवता येतील. मात्र दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल तसेच दुकानासमोर एकाच वेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, असे बंधन राहणार आहे.
अत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा यांच्यासाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून पुरविण्यास मान्यता असेल. कुरियर आणि पोस्टाच्या सेवा सुरू राहतील.
केशकर्तनालय, सलून स्पा आदि दुकाने समाजिक अंतर ठेवणे व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील.
अंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून 50 च्या मर्यादेत व्यक्तीना उपस्थित राहता येईल.सर्व शासकीय कार्यालय 100 टक्के उपस्थितीत सुरळीत सुरु ठेवता येतील. या कार्यालयामध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.