कोरोनाला न घाबरता या ग्रामपंचायतीने केले योग्य नियोजन

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतींने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सुरवातीपासूनच नियोजन केले होते. रेड झोनमधून गावात आलेल्या चाकरमान्यांची तपासणी करताना क्वारंटाईन करुन ठेवण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी होमिओपॅथिक एक हजार गोळ्यांच्या डब्या घरोघरी वाटण्यात आल्या आहेत. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला चार पीपीई किट देण्यात आल्या असून शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन देण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी तळागाळातील ग्रामपंचायती सुयोग्य नियोजन करत आहे. शासनाकडून आलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यावर भर आहे. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायत त्याचा उत्तम नमुना आहे. खाडी किनारी वसलेल्या या गावात मच्छीमारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर टाळेंबदी केली गेली. त्यावेळी वरवडे गावातून बाहेर जाणार्‍यांची तपासणी करुन पाठवले जात होते. त्यानंतर मोठे आव्हान होते ते चाकरमान्यांचे. त्यावरही मात करण्यात यश आले आहे. ग्रामपंचायतीने घरोघरी सर्व्हे करुन किती चाकरमानी येऊ शकतात आणि त्यांचे नियोजन कसे करायचे यावर पुर्वीच आराखडा तयार केला. गावातील शाळा, रिकामी घरे यांची यादीही केली गेली.

आतापर्यंत वरवडेत 80 चाकरमानी दाखल झाले असून तीस जणांना शाळेत ठेवण्यात आले आहे. उर्वरित लोकांची व्यवस्था रिकाम्या खोल्यांमध्ये केली आहे. त्यांच्यावर ग्रामकृतीदलाचा वॉच ठेवला जातो. ग्रामस्थ विरुध्द चाकरमानी वाद होणार नाही यावर सरपंचांकडून जास्त लक्ष दिले जात आहे.
ग्रामपंचायतीतर्फे मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला चार पीपीई कीट देण्यात आली आहेत. तत्पुर्वी कोरोनाच्या तपासणीसाठी महागडी अशी थर्मल गन उपकेंद्राला दिली गेली. त्याचा फायदा वैद्यकीय अधिकार्‍यांना झाला असून शासनाकडून अनेक बाबी अद्यापही उपलब्ध झालेल्या नव्हत्या. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आर्सेनिकच्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप सुरु आहे. वरवडे ग्रामस्थांसाठी त्या गोळ्या मोफत उपलब्ध करुन दिल्या आहेत. सुमारे एक हजार कुटूंबांना डब्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. यासाठी सरपंच निखिल बोरकर यांच्यासह माजी अर्थ सभापती शरद बोरकर, प्रसाद पाटील मनोज विचारे, पद्माकर बोरकर, नारायण बोरकर, दीपक विचारे यांच्यासह सर्व सदस्य उत्स्फुर्ततेने काम करत आहेत. कोरोनापासून वरवडे गाव मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चाकरमान्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले असून त्यांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे गावात सलोख्याचे वातावरण आहे, असे सरपंच निखिल बोरकर यांनी सांगितले.