योग्य नियोजन; जयगडवासीयांना मिळणार मे अखेर पर्यंत पाणी

रत्नागिरी :- तालुक्यातील जयगड पंचक्रोशीत दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते; मात्र यंदा पाणी शेवटपर्यंत पूरावे यासाठी पंधरा दिवसांपुर्वीपासूनच नियोजन करण्यात आले. एक दिवसा आड पाणी आणि जिंदल कंपनीकडून काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा सुरु झाला आहे. जयगड पंचक्रोशीला पाणीपुरवठा करणार्‍या कळझोंडी धरणात पुरेसा साठा असून जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ग्रामस्थांना पाणी पुरेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
कळझोंडी धरणाला लागलेल्या गळतीने जयगड पंचक्रोशीला दरवर्षी मे महिन्यात भीषण पाणी टंचाई असते. गतवर्षीपासून त्यावर मात करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह ग्रामपंचायतींमार्फत पाण्याचे योग्य व्यवस्थापन पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ॠषभ उपाध्ये यांच्यामार्फत सुुरु आहे. दोन वर्षांपुर्वी धरणात खडखडाट झाल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले होते. गतवर्षी यावर काही प्रमाणात मात करण्यात आली. यंदा पावसाने साथ दिल्यामुळे कळझोंडी धरणात चांगला साठा आहे. गळतीमुळे वाया जाणारे पुन्हा धरणात सोडण्यासाठी पंप लावण्यात आला आहे. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीतही दुरुस्तीची कामे सुरु ठेवण्यात आली होती. परिणामी टंचाईची तिव्रता कमी करणे शक्य झाले आहे.
धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सध्या पंचक्रोशीत एक दिवसाआड पाणी सुरु करण्यात आले आहे. जयगड, साखरमोहल्ला, नांदीवडे, कासारी या ग्रामपंचायतींना जिंदल कंपनीला पाणी पुरवठा करणार्‍या खासगी वाहीनीवरुन पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे कळझोंडी धरणातील साठा अन्य गावांसाठी उपलब्ध होत आहे. पंचक्रोशीत 15 ग्रामपंचायती असून सुमारे 25 हजार लोक राहतात. कळझोंडी धरणात सध्या असलेले पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल अशी स्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस सुरु होईल; मात्र पावसाचे आगमन लांबले तर पाण्याचा प्रश्‍न उद्भवू शकतो. जयगड पंचक्रोशीतील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव यांनी सांगितले.