रत्नागिरी:- सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवणार्या मिरकरवाडा येथील दुकानदाराविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. विनाकारण दुकानासमोर गर्दी जमवून अटी व शर्थीचा भंग केला म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक राहुल घोरपडे व चालक जाधव हे मिरकरवाडा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना प्रत्येक दुकानामध्ये सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी ही दुकानदारांची आहे. तसेच ग्राहकांनी दुचाकी, तीन चाकी वाहने घेऊन खरेदीकरिता येऊ नये. तसेच विनाकारण दुकानाबाहेर गर्दी करू नये असे आदेश प्रशासनाने दिले असताना मोहसीन हरुण पटेल यांच्या अल्मजीद जनरल ऍण्ड किराणा स्टोअर्स या दुकानाबाहेर ग्राहकांची अनावश्यक गर्दी जमली होती.
प्रशासनाने दिलेल्या अटी व शर्थींचा भंग केला म्हणून तसेच ज्या कृतीमुळे जीवितास धोकादायक असलेला संसर्ग पसरण्याचा संभव असून हे माहित असताना बेकायदेशीरपणे दुकानासमोर अनावश्यक गर्दी होऊ दिली म्हणून पो. ना. घोरपडे यांनी त्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मोहसीन हरुण पटेल यांच्याविरूद्ध भादंविक ३६९, २७०, १८८, साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ३, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ कदम करीत आहेत.