प्रतिबंधित क्षेत्रात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

रत्नागिरी:- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्रात काम करणारे कोवीड योद्धे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप देण्याचे काम पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो असलेल्या प्रशस्तीपत्रकाची फ्रेम देवून कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. 

राज्यात प्रथमच रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी दिली. मंगळवारी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात जावून डॉ. मुंढे यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कर्मचाऱ्याचे मनोबल वाढविले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोना बाधितांचे संख्या ९२ पर्यंत पोहचली आहे. या कालावधीत अनेकजण हे संस्थात्मक क्वारंटाईन असल्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त लावावा लागला नाही. परंतु जिल्ह्यात १४ पेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या ठिकाणी २४ तास पोलिसांना बंदोबस्त करावा लागत आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व विनापरवाना येणाऱ्या चाकरमान्यांना रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 
गंभीर परिस्थितीतही काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे यासाठी पोलिस अधीक्षकांनी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस कर्मचाऱ्यांचा फोटो असलेले प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी कल्पना अंमलात आणली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र बंदोबस्त ठिकाणी पोलिसांना जाऊन देण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधिक्षक आयूब खान, पोलीस निरिक्षक शिरिष सासने, अनिल लाड आदी अधिकारी उपस्थित होते.