परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी: प्रवीण दरेकर

रत्नागिरी:- सरकार कोरोनाच्या परिस्थिती हाताळण्यास 100 टक्के अपयशी ठरल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रत्नागिरीत बोलताना केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे जनतेचा उद्रेक होत आहे. आता त्यामुळे भाजपने महाराष्ट्र बचाव मोहीम हाती घेतली आहे. आता कुठे सरकार खडबडून जागे होत आहे. तशाच पद्धतीची जाग आणण्यासाठी आम्ही रायगड, रत्नागिरी, सिंधुुदुर्गचा दौरा करीत असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागले. राज्यातील शिवसेना सरकार व स्थानिक मंत्र्यांचे अपयशामुळे व प्रशासनसोबत समन्वय नसल्यामुळे ही स्थिती उद्भवली. जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत कुठेही व्यवस्थेत समन्वय नसल्याचे दिसले आहे. शिवसेनेने मच्छीमार, आंबा, काजू, सुपारी, नारळ बागायतदारांना वार्‍यावर सोडले. इथल्या उद्योगांना कोणतेही पाठबळ नाही. आता लवकरच मोसमी पाऊस सुरू होणार आहे. तत्पूर्वी बांधावर बी-बियाणे देऊ, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. हे बियाणे मोफत मिळावे व बांधावर नेऊन द्यावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.
व्यावसायिक, मध्यम, लघु उद्योजकांना आधाराची गरज आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात मच्छीमारांचा समावेश आहे. आता राज्याने स्वतंत्र पॅकेज घोषित केले पाहिजे. पालकमंत्री व परिवहन मंत्री असणार्‍या अनिल परब यांनी मोफत एसटीची घोषणा केली. पण एसटी सुटली नाही व ज्यांनी पैसे भरले त्यांच्यासाठी सुद्धा एसटीने सोय केली नाही.