रत्नागिरी:- कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीतून अर्थचक्राला चालना देण्यासाठी उद्योग सुरु करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील 937 पैकी 551 उद्योगांची धडधड सुरु आहे. यामध्ये 10 हजार 324 कामगार कार्यरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती काळजी कंपनीस्तरावरुन घेतली जात असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. तिसर्या टाळेबंदीत देशभरातील उद्योग सुरु करण्यासाठी पावले उचलण्यात आली. त्यासाठी अटी व शर्थीही घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतीमधील उद्योग सुरु झाले आहेत. त्याची परवानगी एमआयडीसी कार्यालयातून घेणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्ह्यात 937 उद्योग विविध ठिकाणी आहेत. सर्वाधिक रत्नागिरी आणि लोट मध्ये आहेत. ज्या उद्योगांना अटींचे पालन करणे शक्य होते त्यांनी आरंभ केला. त्यात जिल्ह्यातील 551 उद्योगांचा समावेश आहे. अजूनही 386 उद्योग बंद अवस्थेत आहेत. या उद्योगांमध्ये बहूतांश कामगार वर्ग हा आजूबाजूच्या गावातून येणारा आहे. कामाच्या ठिकाणी येण्यासाठी एसटी सेवा हा पर्याय आहे. त्यामुळे कामगार वर्गाची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. तरीही 551 उद्योगात 10 हजार 324 कामगार काम करत आहेत. त्यांची ने-आण करण्यासाठी बहूतांश कंपन्यांनी स्वतःच्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. काही कामगार स्वतःच्या दुचाकीवरुन येत आहेत. ही धडधड सुरु झाल्यामुळे अनेक कामगारांच्या रोजगारा प्रश्न मार्गी लागला आहे; परंतु परजिल्ह्यातून येणार्या कच्च्या मालावर आधारीत उद्योगांचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंपन्या, कारखाने मोठ्याप्रमाणात उत्पादन करु शकलेले नाहीत. काही ठिकाणी परराज्यातील कामगारांचा राबता होता. कोरोनाच्या भितीने काही कामगार वर्ग गावी निघून गेला आहे. त्याचा थोडासा परिणाम उद्योगांना जाणवणार असून कामगारांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.