काही ठिकाणी होम कोरन्टीन लोकांना घराला कुलूप लावून बंद करण्याचे प्रकार!

चाकरमान्यांना काही ठिकाणी मिळणारी अमानवी किंवा कैद्यांप्रमाणे वागणूक दुर्दैवी

गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांचे मुख्यमंत्री यांना पत्र

होम कोरन्टीन बाबत दक्षता पथकांसाठी जिल्हा स्तरावर एकच नियमावली करण्याची मागणी!

रत्नागिरी:- कोकणासह महाराष्ट्रात मुबंई पुणे येथील चाकरमानी परवानगी घेऊन गावी परतले आहेत.काही नागरिक अगतिकता किंवा पर्याय नाही म्हणून विनापरवाना शहर सोडून गावी परतले आहेत.प्रशासनाने या लोकांना होम कोरन्टीन केले असून काही ठिकाणी या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ घातले असून याबाबत आता गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

ग्रामीण भागात दक्षता पथकांसाठी कोरन्टीन करण्याबाबत एकच नियमावली तयार करून वेगवेगळ्या निर्णयांना व ,काही ठिकाणी घराला कुलूप लावून लोकांना आत मध्ये बंद करण्यासारख्या प्रकारांना आळा घालण्यात यावा असे या पत्रात खंडागळे यांनी म्हटले आहे.
कंटेन्मेंट झोनच्या बाहेरून गावी आलेल्या चाकरमानी यांना होम कोरन्टीन करण्याचा निर्णय स्थानिक जिल्हा प्रशासनाने घेतला आहे जो योग्यच आहे.अनेक नागरिक,महिला ,लहान मुले गावकऱ्यांनी सांगितलेले नियम पाळत आहेत.ग्राम दक्षता पथकाच्या माध्यमातून शासन गावागावात कोरोना बाबत चांगले काम करत आहे,ग्रामीण भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतःला या कामात झोकून दिले आहे असेही खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे काही गावांत नेमण्यात आलेली ग्राम दक्षता पथक मानवतेला लाजवतील अशी कृत्य करत असून होम कोरन्टीन असलेल्या लोकांना एखाद्या कैद्यां प्रमाणे वागणूक दिली जात असल्याकडे खंडागळे यांनी लक्ष वेधले आहे.लोकांना घरात बंद करून बाहेरून कुलूप लावण्याचे प्रकार काही ठिकाणी घडत आहेत.हे अतिशय चुकीचे आणि अन्यायकारक आहे.स्वतंत्र घर असणाऱ्यांनाही त्यांच्या अंगणात बसण्याचे स्वातंत्र्य देखील नाकारले जात आहे.हे थांबायला हवे.नियम कठोर असावेत यात दुमत नाही मात्र ते अमानवी असू नयेत.हे सर्व अति भीती आणि गैरसमज मधून होत असून शासनाच्या ग्रामीण पातळीवरील कर्मचाऱ्यांमार्फत याबाबत लोकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे.नुकताच घराला कुलूप घालून चाकरमानी माणसांना आत ठेवण्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील निवळी या गावी पवार कुटूंबिय व अन्य लोकांच्या बाबतीत उघडकीस आला आहे.अन्य गावात ही अशा प्रकारच्या घटना घडण्याची/घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

गाव दक्षता पथक जी बनविण्यात आली आहेत त्यांना होम कोरन्टीन लोकांसाठी जिल्हा स्तरावर एकच नियमावली बनवून देऊन त्याच पद्धतीने गावातील कोरोना नियंत्रणाची स्थिती हाताळण्याच्या सूचना द्याव्यात अशी विनंती खंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

कोणत्याही स्थितीत काही गाव दक्षता पथकांना मनमानी करण्याची संधी मिळू नये…गटातटाचे राजकारण करण्याची संधी कोरोनाच्या निमित्ताने मिळू नये…कोरोना बाबत जागृती आणि भीती याबाबत गाव पातळीवर जनजागृती होणे गरजेचे आहे .काही गाव राज्य शासन,जिल्हा प्रशासन यांच्या नियमावली पलीकडे स्वतःच एक,दोन दिवस गाव बंद ठेवण्याचे फर्मान काढत आहेत.आता मोलमजुरी,शेतीची कामे जवळ आहेत त्यामुळे दोन महिने बंद पाळल्या नंतर गाव पातळीवर आणखी बंद सामान्य माणसाला परवडणारा नाही असे खंडागळे यांनी म्हटले आहे.एखाद्या जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामीण भागासाठी एकच नियमावली ठरवून देऊन त्याच नियमावली प्रमाणे ग्राम दक्षता पथकाने काम करावे अशा सूचना आपण जिल्हा प्रशासनास द्याव्यात अशी मागणी सुहास खंडागळे यांनी गाव विकास समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांना केली आहे.