एसटी प्रशासनाकडून नियमबाह्य भाडे वसुली

रत्नागिरी:- लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेल्या दुचाकी एसटी आगारात ठेवण्यात आल्या होत्या. दुचाकी परत करताना एसटी प्रशासनाने नियमबाह्य पार्किंग दंड वसूल करत आहे. अशा प्रकारे दंड वसुलीचे कोणतेही अधिकार नसताना एसटी प्रशासनाकडून सुरू असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

लॉकडाऊन काळात अनेकजण विनाकारण वाहने घेऊन बाहेर फिरताना दिसून आल्याने जिल्हा वाहतूक शाखा आणि आरटीओ यांनी कारवाई सुरू केली. सुरवातीला समज दिली, त्यानंतर दंडात्मक कारवाई केली, तरी वाहनधारक ऐकत नसल्याने वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली. काही वाहने पोलिस परेड मैदानावर ठेवण्यात आली, तर काही वाहने माळनाका येथील एसटी आगारात ठेवण्यात आली. 
वाहन सोडवून नेण्यासाठी येणार्‍या वाहनधारकांना जेवढे दिवस वाहन ठेवले आहे, त्याचे भूईभाडे किंवा पार्किंग चार्ज वसूल करण्यात येत आहे. वाहतूक पोलिस किंवा आरटीओंनी जप्त केलेल्या गाड्या त्यांनी सुरक्षित ठेवायच्या आहेत. त्यात वाहनधारकांचा काही संबंध नाही. एसपी ऑफिसला ठेवलेल्या गाड्या कोणतेही शुल्क न घेता दंड भरून सोडून दिले. मात्र एसटी आगारात ठेवलेल्या गाड्यांसाठी चुकीच्या पद्धतीने पार्किंग चार्ज घेतला जात आहे. टाळेबंदीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या वाहनधारकांचे एसटीच्या या नियमामुळे कंबरडेच मोडले आहे. याबाबत आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, आरटीओ विनोद चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी पार्किंग चार्ज न आकरण्याच्या सूचना देऊनही एसटी विभाग त्यांचा आदेश डावलून कर वसूल करीत आहे, असा आरोप नगरसेवक सोहेल मुकादम यांनी केला.