एकीकडे कोरोना विरोधात लढाई आणि जि. प. त सीईओंच्या केबिन दुरुस्तीची घाई

रत्नागिरी:- येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या केबीनची दुरुस्ती चर्चेचा विषय ठरला आहे. दोन वर्षांपुर्वी तत्कालीन अधिकार्‍यांनी नुतनीकरण केले होते. त्यानंतर पुन्हा केबीनची दुरुस्ती सुरु झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. केबीनमधील दिशांतरासाठी हा खटाटोप सुरु असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे विकासकामांवरील अत्यावश्यक कामे वगळून काही निधी कोविडवर खर्च केला जात आहे. या परिस्थितीमध्ये केबीनच्या दुरुस्तीवर हजारो रुपयांचा खर्च करण्याची आवश्यकता होती का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेचे यंत्रणा चोविस तास कामाला लागलेली आहे. शासनाने विकासकामांच्या निधीत जवळपास कात्री लावली आहे. तसेच अतिमहत्त्वाचे असेल तरच निधी खर्च करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यात पाणीटंचाईसह प्रशासकीय मान्यता असलेल्या विविध विकास कामांचा समावेश आहे. कोरोनामुळे शासन निधीला कात्री लावत असताना दुसर्‍या बाजूला मात्र जिल्हा परिषदेमध्ये अधिकार्‍यांच्या केबीन दुरुस्तीवर होणारा खर्च चर्चेचा विषय ठरलेला आहे. नवीन अधिकारी काही महिन्यांपुर्वी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यांच्यापुर्वी असलेल्या अधिकारी एकच वर्ष कार्यरत होते. दोन वर्षांपुर्वी याच केबीनवर लाखो रुपये खर्च झालेले होते. सध्या सुरु असलेल्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होणार आहेत. याप्रकारे होणार्‍या खर्चाला कात्री लागणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.