रत्नागिरी:- राजधानी एक्सप्रेसमधून आलेले प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरणार हे पूर्वनियोजित असल्याचे समोर आले आहे. त्या प्रवाशांनी मडगाव पर्यंत तिकीट काढले होते. गाडी रत्नागिरी स्थानकात थांबण्याचे निश्चित नसताना गाडी तांत्रिक कारणास्तव रत्नागिरी स्थानकात थांबली असता जवळपास तीनशेजण राजधानीतून उतरले. या प्रवाशांना नेण्यासाठी सांगलीच्या 3 तर रत्नागिरी डेपोच्या 12 गाड्या तैनात होत्या. अंत्यंत गोपनियता पाळत करण्यात आलेले हे नियोजन मुंबई रिकामी करण्याच्या दृष्टीने असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी केंद्राने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या शनिवारी दिल्ली ते मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. या गाडीला रत्नागिरी स्थानकावर तांत्रिक कारणासाठी काही मिनिटांचा थांबा देण्यात आला होता. ही गाडी रत्नागिरी स्थानकात थांबल्यानंतर सुमारे अडीचशे ते तिनशे प्रवासी उतरले. रेल्वे येणार असल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होती. स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना सूचना देत त्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत होती. त्या लोकांची माहिती एका अर्जावर भरुन घेण्यात आली आहे. प्रवाशांनी मडगावपर्यंत तिकीट काढून ते रत्नागिरीत उतरले. त्या गाडीला रत्नागिरील थांब्याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता.
मात्र याची माहिती घेतली असता संपुर्ण यंत्रणेला याची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच या गाडीतून सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, देवरूख, पूर्णगड आदी भागातील प्रवाशांना सोडण्यासाठी 12 गाड्यांचे नियोजन केले होते. 3 गाड्या सांगली एसटी डेपोच्या होत्या. त्या आधीच रत्नागिरीत येऊन थांबल्या होत्या. रत्नागिरी डेपोच्याही गाड्या तयार होत्या.यावरून शासनाने बिनभोबाट मुंबईतील प्रवाशांना सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. एका गाडीतून सोशल डिस्टन्स ठेऊन 22 प्रवाशांना सोडले जाते. त्याप्रमाणे अडिचशेच्या वर प्रवाशी राजधानी एक्स्प्रेसमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.