रत्नागिरी :- जिल्ह्यात 48 गावांमधील 88 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मागील आठवड्यात संगमेश्वर व लांजा तालुक्यात टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडली आहे. उर्वरित चार तालुक्यातील स्थिती जैसे थे आहे. राजापूर, रत्नागिरी आणि गुहागर या तिन तालुके टँकरमुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
अवकाळी पाऊस अधूनमधून जिल्ह्यात बरसत असला तरीही टंचाईवर मात करण्यासाठी तो अपूरा पडत आहे. त्यामुळे दर आठवड्याला जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. खेड, मंडणगड, चिपळूण, दापोली या चार तालुक्यातील टँकरग्रस्त वाड्यांची संख्या स्थिर आहे; मात्र संगमेश्वरात 2 गावातील सहा वाड्यांची तर लांजा तालुक्यातील 1 गावातील सहा वाड्यांची टँकरसाठी भर पडली आहे. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार कोकणात जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन होणार आहे. त्यानुसार टँकरग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. प्रशासनही खासगी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे.