रत्नागिरी :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतत आहेत. याचाच परिणाम जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासात 11 हजार 490 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून एकूण 29 हजार 259 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 92 वर पोचली आहे. बाधित रुग्ण हे मुंबईतून परतलेले असून स्थानिक असलेल्या बाधितांची संख्या तुलनेने कमी आहे. जिल्ह्यात तपासणीसाठी 4 हजार 643 नमुने घेण्यात आले आहेत. यापैकी एकूण 4 हजार 117 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 426 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. जिल्ह्यात येण्यासाठी 44 हजार 531 जणांनी अर्ज केले आहेत तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 53 हजार 979 जणांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 29 हजार 259 वर पोचली असून येणाऱ्या कालावधीत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 141 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या 9 जणांच्या जेवणाची व्यवस्था, शिवभोजन थाळी, तहसिल कार्यालये आणि NGO च्या माध्यमातून करण्यात आली आहे.