रत्नागिरी:- देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश कोल्हापूर विभागात करण्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांसह मृत्यू झालेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. तर कोल्हापूर विभाग राज्यात ७ क्रमांकावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९५ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारी जाहिर केली आहे.
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. सुमारे अडीच महिन्यांपुर्वी कोरोना भारतात दाखल झाल्यानंतर काहि दिवसात राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कोल्हापूर विभागातअंतर्गत करण्यात आला आहे. कोल्हापूर विभागअंतर्गत कोल्हापूर ग्रामीण ३० , महानगर पालिका क्षेत्र ६, सांगली ४२ , मिरज ,कुपवाड पालिका ८, सिंधुदुर्ग१० रुग्णांचा समावेश आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९५ रुग्ण सापडले आहेत. सुरुवातीच्या दोन महिन्यात रत्नागिरी जिल्ह्याने कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. मात्र चाकरमान्यांच्या आगमनानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसात कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सध्या हि संख्या ९५ वर पोहचली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागात जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला आहे.
राज्यातील विभागनिहाय मुंबईसह ठाणे २५१३० रुग्ण प्रथम, पुणे ४३२५ रुग्ण द्वितीय, नाशिक १२९५ रुग्ण तृतीय, औरंगाबाद १०६९ चौथा, अकोला ५११ रुग्ण पाचवा, नागपूर ३६८ सहावा, कोल्हापूर १९१ रुग्ण सातवा, लातूर १२३ रुग्ण मिळल्याने आठव्या क्रमांकावर आहे.