नर्सिंगच्या विद्यार्थिनीसह पाचजणांची कोरोनावर मात

रत्नागिरी:- एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या शंभरी गाठत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील हळूहळू वाढत आहे. रविवारी पाच जणांनी कोरोनावर मात केली. यात नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीसह पाच जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, पुण्यातून पास घेऊन आलेल्या चाकरमान्यांना रत्नागिरीच्या सीमेवर रोखले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी आहे. हे लोंढे थांबविण्यास पोलिसांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्याची संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची क्षमताही संपल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरी हे लोंढे थांबत नसल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये पाच, सहा, अकरा या पटीत दिवसाला रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 92 वर गेली आहे. कधीही 100 पार करण्याची शक्यता आहे.मात्र यात दिलासादायक म्हणजे गेल्या चार ते आठ दिवसांमध्ये कोरोनावर मात करणार्‍यांची संख्याही चांगली वाढली आहे. आतापर्यंत आठ ते दहा जणांनी कोरोनावर मात गेली होती.

काल पुन्हा 5 जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुरवातीला राजीवडा आणि साखरतर भागात सापडलेल्या कोरोना बाधित भागाचा सर्व्हे या नर्सने केला होता. त्यानंतर तिलाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली. तिच्या समवेत राहणार्‍या तिच्या 3 सहकारी नर्सचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण होते मात्र आता यातील पहिली प्रशिक्षित नर्स पूर्णपणे बरी झाली असून इतर 3 नर्स यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे, अशी माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बोल्डे यांनी दिली.