टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; तिघे जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड खंडाळा बायपास रोडवरील चाफेरी गवळीवाडा येथे ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणार्‍या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर उलटून हौद्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. पोलीस कर्मचारी दीपक साळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयगड पोलीसांनी चालक राजेंद्र भागोजी कोलकांड (वय ३८, रा. जांभारी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चालक राजेंद्र कोलकांड हा आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन खंडाळा ते जयगड असा जात होता. टेम्पोच्या हौद्यातून पाच जण प्रवास करत होते. टेम्पो चाफेरी गवळीवाडा येथे आल्यानंतर समोरून जाणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करून टेम्पो पुढे जात असताना वळणावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो साईड पट्टीवर उलटला. यावेळी टेम्पोच्या हौद्यात बसलेले शिवाजी जयसिंग रजपुत (रा.तडसर जि. सांगली), गोनौर वैजनाथ राव (रा.बिहार ) या दोघांचा मृत्यू झाला तर रामानुज शालीनी सिंह, सुंदरम संजय सिंह, नागेंद्र विनोद गुप्ता रा.उत्तरप्रदेश हे जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साळवी यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर चालक राजेंद्र कोलकांड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.