रत्नागिरी :- जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचारी सध्या वाऱ्यावर सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा तर सोडाच पण हक्काचं मानधन देखील अत्यंत विलंबाने मिळत आहे. या सर्व समस्यांची कैफियत जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात डी.एम.इंटरपाईज कंपनी मार्फत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना केवळ 5 हजार 500 इतक्या वेतनावर काम करावे लागत आहे. हे दिले जाणारे वेतन देखील वेळेवर मिळत नसल्याची कैफियत निवेदनाद्वारे या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे मांडली आहे. गेली 10 ते 12 वर्षे जिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागात हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याठिकाणी सर्व प्रकारची घाण व कचरा उचलण्याचं काम करत आहेत. परंतु सुरक्षा विषयक कोणतीही साधने उपलब्ध करून दिली जात नसल्याचे म्हणणे आहे. सद्यास्थितीत कोरोनाच्या लढाईत हे सर्व कर्मचारी पॉझिटिव्ह विभाग, स्किनींग विभाग, तसेच कोरोंटाईन विभाग या सर्व ठिकाणी कार्यरत आहेत. तरी देखील कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच पुरविले जात नाही. विमा संरक्षण नाही, पीएफ देखील कापला जात नाही. गणवेष देखील स्वतच्याच पैशातून घ्यावा लागत आहे. या समस्यांबाबत तकार केल्यास काम करायचे असेल तर करा, अन्यथा काम सोडून जा अशीही ताकीद दिली जात असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते.