रत्नागिरी :- चाकरमान्यांना गावात फिरु न देण्याची जबाबदारी ग्रामकृती दलाच्या सदस्यांवर सोपविण्यात आली आहे. सांगुनही कुणी बाजारात गाड्या फिरवत असतील तर त्यांच्या गाड्यांच्या चाव्या काढून चौदा दिवस ग्रामकृती दलाने आपल्याकडे ठेवाव्यात. तसेच गावात सलोख्याचे वातावरण राहील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या.
कोरोनाबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांची जिल्ह्यातील पहिली समन्वय सभा जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या उपस्थित रविवारी (ता. 17) देवरूख येथे झाली. बैठकीला माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, सभापती बंडा महाडिक, राजापूर- लांजा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयाशेठ माने, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे खातेप्रमुख, विस्तार अधिकारी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचा निर्णय, तीन गावांसाठी एक खासगी रुग्णवाहिका ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत हा उद्देश आहे. गरज भासल्यास 108 चा वापर करावा. मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनी बाजारात तसेच गावात फिरू नये याची काळजी गाव, वाडीतील कृतीदलांनी घेतली पाहिजे. सध्या बाजारात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी पासिंगच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. त्यांच्या वाहनाची चावी काढून चौदा दिवस गावकृती दलाकडे द्यावीत, असा निर्णय घेण्यात आला. चाकारमान्यांना आरोग्य तपासणी करून शक्यतो घरातच ठेवण्यात येणार आहे. गरज भासल्यास शाळा, अंगणावाडी, समाज मंदिर येथे ठेवण्यात यावे. ते राहत असलेल्या ठिकाणांची फवारणी व स्वच्छता ही गाव कृती दलाने करावी अशा सूचना बने यांनी दिल्या. गावात सामाजिक सलोखा राहील याची जबाबदारी प्रत्येक गावकृती दलाची राहील. प्रत्येक गावाचा प्रशासनाला सोबत घेवून आढावा घ्यावा, असे आवाहन बने यांनी केले आहे.