रत्नागिरी:- कोरोना आणि अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांसमोर आणखी एक मोठे संकट गुजरातच्या व्यापार्यांनी उभे केले आहे. गुजरातच्या आंब्याचा पल्प काढून तो रत्नागिरी हापूसच्या नावे बाजारात विकला जात आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक बागायतदार आणि व्यावसायिक अडचणीत आले आहेत. एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये हे ट्रक येत असून तेथून हा पल्प तयार करून विकला जात असल्याचे बागायतदारांनी सांगितले. यावर बाजार समिती किंवा पोलिस प्रशासन काही कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
आंबा हंगामाला यंदा तरी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना विषाणूचे मोठे संकट उभा राहिले आणि संपूर्ण देश थांबला. टाळेबंदीमुळे तयार झालेल्या आंब्याला बाजारपेठच नसल्याने आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला. अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे आंब्याची ज्या पटीने निर्यात व्हायला हवी होती, झाली नाही. संपुर्ण वाहतूक थांबल्याने हा प्रश्न निर्माण झाला. कालांतराने आंब्याच्या वाहतुकीलाही परवानगी दिली. बागायतदारांना हा मोठा दिलासा होता. बागायतदारांनी तयार झालेला आंबा जिल्हा प्रशासनाचे पास घेऊन मुंबई, पुणे, वाशी, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात पाठवला. त्याला अपेक्षित दर मिळाला नसला तरी मागणी प्रमाणे आंब्याचा पुरवठा सुरू झाला. बागायतदारांना हा मोठा दिलासा होता. वर्षभर औषध फवारणी पासून अन्य खर्चाचा ताळमेळ घालताना ही एक जमेची बाजू होती. आता रत्नागिरी हापूसला बाजारपेठ मिळत आहे.
मात्र आणखी एक संकट या बागायतदारांपुढे आता उभे राहिले आहे. गुजरातच्या व्यापार्यांनी स्थानिक बाजारपेठेत अतिक्रमन केले आहे. गुजरातच्या आंब्याचा पल्प काढून तो रत्नागिरी हापूसच्या नावाखाली विकला जात आहे. याचा स्थानिक बागायतदारांवर मोठा परिणाम होत आहे. ट्रकच्या ट्रक एमआयडीसीतील एका कंपनीत दाखल झाले असून तेथे हा पल्प तयार होत आहे. त्यामुळे रत्नागिरी हापुचे नाव बदनाम करून हे व्यापारी गुजरातच्या आंब्याचा पल्प विकत असल्याचे काही आंबा बागायतदारांनी पुढे आणले आहे. या गाड्यांवर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंद आहे का, किंवा पोलिस दलाकडे याची नोंद आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
कोरोना आणि अवकाळी पावसामुळे आदीच आंबा बागायतदाराचे कंबरडे मोडले आहे. गुजरातच्या या व्यापार्यांनी अतिक्रमन करून रत्नागिरी एमआयडीसीतील एक्झॉटिक कंपनीमध्ये पल्प तयार केला जात आहे. रत्नागिरी हापूसच्या नावाखाली गुजरातच्या आंब्याचा पल्प विकला जात आहे. यामध्ये स्थानिक बागायतदार, व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केली आहे.