अम्फान चक्रीवादळाचे कोकण किनारपट्टीवर पडसाद

रत्नागिरी ः- बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे पडसाद रविवारी कोकण किनारपट्टीवर दिसून आले. रविवारी पहाटे पासून किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यानी हजेरी लावली होती. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकांना वेगवान वार्‍याच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मासेमारी करता येत नसल्याने नांगरावर उभ्या करुन ठेवल्या जात आहेत.

पुढील चोविस तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीतील राज्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अम्फान चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज आहे. या वादळाचा वेग ताशी 55-66 किमी राहणार आहे. ते वादळ (ता. 17) शनिवारी सायंकाळपर्यंत बंगालच्या उपसागरातून ते पुढे पुढे सरकत होते. या वादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे. दोन दिवसापुर्वी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पावसासह वादळी वार्‍यांनी धुमाकुळ घातला होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसानही झाले होते. सध्या मासेमारी हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. कोरोनामुळे काही दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. महिन्याभरानंतर मच्छीमारी नौका समुद्रात जाण्यास सुरवात झाली; परंतु अम्फान वादळाचे संकट घोगावत आहे. अद्यापही मोठे वारे वाहत नसले तरीही किनारी भागात हलचल सुरु झाली आहे. हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. टाळेबंदी उठल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात मच्छीमारांना बंपर मासळी मिळालेली नाही; मात्र कुणाला 15 टप तर कुणाला 20 टप अशी मासळी मिळत आहे. सध्या पेप्टी गेदर, काप यासारखे मासे 15 ते 20 टप (एक टप 32 किलो) मिळत आहे. त्याला सरासरी दर 2500 ते 3000 रुपये मिळत आहे.

आवक कमी असल्यामुळे दर बर्‍यापैकी मिळत आहेत. रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या वेगवान वार्‍यामुळे समद्रात गेलेल्या काही नौकांना अडथळे निर्माण होत होते. काहींनी वार्‍याचा वेग लक्षात घेऊन नौका नांगरावरच उभ्या करुन ठेवल्या होत्या. गेले दोन दिवस हलके वारे वाहत होते. त्याही परिस्थिती मच्छीमारी सुरुच ठेवली होती. टाळेबंदीच्या कालावधीतील कसर भरुन काढण्यासाठी मच्छीमारांचे प्रयत्न सुरु आहेत.