सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे केले आहे. तरी शहरातील धनजीनाका, राधाकृष्ण नाका व जेल रोड येथील तीन दुकानदारांनी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्धल शहर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दिलीप रामचंद्र झगडे (वय 59, रा. जेल रोड, रत्नागिरी) यांचे विघ्नेश्‍वर जनरल स्टोअर्स, सलिम अब्दूल्ला अकवाणी (वय 46, रा. धनजीनाका-रत्नागिरी) यांचे उमर ट्रेडर्स, नितीन पुरुषोत्तम बेर्डे (वय 55, रा. राधाकृष्ण नाका, रत्नागिरी) यांचे बेर्डे भांडार, अशी संशयित दुकानदारांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. 16) दुपारी एकच्या सुमारास धनजीनाका ते राधाकृष्ण नाका येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील यांच्या समवेत पोलिस नाईक पवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश हरचकर, असे धनजीनाका परिसर व बाजारपेठ पेट्रोलिंग करत होते. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक दुकानामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) राखण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. ग्राहकांनी दुचाकी, तीनचाकी वाहने घेऊन खरेदी करू, नये व विनाकारण अनावश्यक दुकानासमोर गर्दी करू नये, थांबू नये, असे स्पष्ट आदेश आहेत. तरीही धनजी नाका येथील विघ्नेश्‍वर टोबॅको सेन्टर तसेच उमर ट्रेडर्स व राधाकृष्ण नाका येथील बेर्डे भांडार यांच्या दुकानासमोर गर्दी दिसून आली. दुकानदारांना समाजिक अंतर ठेवण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. तरीही दुकानदारांनी दुकानासमोर ग्राहकांची अनावश्यक गर्दी करून अटी-शर्तीचा भंग केला. 
त्यामुळे आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल हरचकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 चे कलम 3, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियाम कलम 51 (ब) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बगड करत आहेत.