साडेचार लाख कुटूंबाना होमिओपॅथिक कोरोना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणार

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतेय मात्र हे आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही अफवा न पसरवता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगतानाच जिल्ह्यात आजपासून साडेचार लाख कुटुंबांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक होमिओपॅथी गोळ्या ‘आर्सेनिक अल्बमचे’ वाटप होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत रविवारी सांगितले.

आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्या व्यक्तींमधील प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते त्यामुळे आज देशभरात याला मागणी वाढली आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी या गोळ्या वाटप करणारा रत्नागिरी जिल्हा पहिला आहे. याचे नियोजन जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयुष विभागाकडून करण्यात आले आहे. एकही कुटुंब वंचित राहू नये अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत असून गोळ्यांची उपलब्धता कमी असेल तर दोन टप्प्यात याचे वाटप होईल. या गोळ्या तीन दिवस सकाळी उपाशी पोटी घ्यावयाचे असून याची माहिती गोळ्या वाटप करताना देण्यात येणार आहे. या गोळ्यांमुळे खूप चांगले परिणाम होतो. आपली प्रतिकार शक्ती निश्चितच वाढते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे प्रतिबंधात्मक औषध असल्याचेही ना. सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोल्डे,  नगराध्यक्ष प्रदीप साळवी, आयुष डॉक्टर अश्फाक काझी आदी उपस्थित होते.