भाटीमिऱ्यात दोन गटात तुफान राडा; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या भाटीमिऱ्या बागकरवाडी येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात  राडा  झाला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून शहर पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
सूर्यकांत रविकांत रांदपकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १५ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास  ते त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालून सोबत मुलगी सिद्धी, मुलगा रुद्र यांच्यासमवेत दत्त मंदिराजवळून चालत जात असताना जागेच्या पूर्ववैमनस्यातून जयेश नार्वेकर यांनी गाडी घेऊन अंगावर येत शिविगाळ  केली. याचा जाब विचारल्याने जयेश नार्वेकर यांनी आपल्याला मारहाण केली तर यावेळी स्मित नार्वेकर, सुरेश नार्वेकर , महेश नार्वेकर यांनीही आपल्याला मारहाण केली तर ऋषिकेश नार्वेकर यांनी काठीने मारहाण केल्याची तक्रार सूर्यकांत रांदपकर यांनी शहर पोलीसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी जयेश नार्वेकर,  स्मिता नार्वेकर, सुरेश नार्वेकर, महेश नार्वेकर, ऋषिकेश नार्वेकर यांच्याविरोधात भादंविक १४३,१४७,१४९,३२४, ५०४ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर कुणाला नार्वेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते दि.१५ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या वडीलांना गाडी घेऊन जात असताना दत्त मंदिर जवळ सूर्यकांत रांदपकर यांनी कुत्र्याचा पट्टा सोडून त्याला अंगावर सोडले. त्यामुळे आपले वडील गाडीवरून तोल जाऊन खाली पडले. याचा जाब विचारला असता सूर्यकांत रांदपकर व त्यांची पत्नी संतोषी उर्फ श्रुती रांदपकर यांच्यासह प्रियेश मयेकर, प्रवीण मयेकर यांनी आपल्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.