रत्नागिरी :- जिल्ह्यात यावर्षी डेंग्यूचे प्रमाण फारच कमी आहे. आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी जनजागृती केली जाते. जानेवारीपासून 117 जणांची तपासणी केली. त्यापैकी 17 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 16 मे हा दिवस जिल्ह्यात सर्वत्र ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ म्हणुन साजरा करण्यात आला आहे. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एजिप्टाय नावाच्या डासामूळे होतो. या डासाची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवू नये, याची सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन जि. प. आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमीत्त डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
केंद्र शासनाने डेंग्यूसंबंधी मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले असून अॅन्ड्राईड मोबाईलवर प्ले-स्टोर मध्ये अॅप मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतल्यास डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. कोवीड-19 सोबत गृह भेटीद्वारे जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम व एक दिवस कोरडा पाळण्यात यावा, असे नागरिकांना जि. प. आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर व हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी आवाहन केले आहे. तसेच हा डेंग्यू दिन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला.