रत्नागिरी :- मुंबईसह अनेक कारागृहांमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्र शासनाने इमर्जन्सी पॅरोल म्हणून शिक्षा झालेल्या कैद्यांना 45 दिवसाच्या रजेवर सोडण्याचे आदेश काढले. त्यानुसार जिल्हा विशेष कारागृहातून शिक्षा झालेल्या 8 पक्क्या कैद्यांना 45 दिवसाच्या पॅरोलवर सोडले आहे. विशेष म्हणजे अजूनही रत्नागिरी जिल्हा कारागृह कोरोनापासून सुरक्षित आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वीच शासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. कारागृह अंतर्गत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकेल, अशा कैद्यांना 45 दिवसाच्या पॅरॉलवर (रजेवर) सोडण्यात आले. रत्नागिरी विशेष कारागृहातील 19 कैद्यांना त्याचा फायदा झाला. मात्र तरी 150 कच्चे-पक्के कैदी अजून कारागृहात आहेत. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी कारागृह प्रशासनाने घेतली आहे. प्रत्येकाला मास्क, बराकमध्ये हॅण्डवॉश, सोशल डिस्टन्स आदींची सक्ती केले आहे. शासनाने दिलेले नियम आणि निकष अतिशय काटेकोरपणे पाळले जात आहेत. कारागृहात गर्दी होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.
राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाने थैमान घातले आहे. हजारोंच्या संख्येने दिवसाला बाधित रुग्ण सापडत आहेत. लॉकडाऊन वाढवून संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरूच आहे. आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे रोजी सुरू होणार आहे. त्यामध्ये काही सवलती दिल्या जाणार असल्या तरी बंधनेही घातली जाणार आहेत. दरम्यान, मुंबई कारागृहात सुमारे 102 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतला. शिक्षा भोगत असलेल्या पक्क्या कैद्यांनाही इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्याचा आदेश जारी केला. त्यानुसार जिल्हा कारागृहातील 8 कैद्यांना 45 दिवसांसाठी इमर्जन्सी पॅरोलवर (रजेवर) सोडण्यात आले आहे. कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख आणि तुरुंग अधिकारी अमेय पोतदार व अन्य कर्मचार्यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा विशेष कारागृह अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहे.