कंटेन्मेंट झोनमधून येणारे संस्थात्मक विलीगिकरणातच राहणार

रत्नागिरी :- कंटेन्मेंट झोन किंवा रेड झोनमधून येणार्‍या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात नागरी कृती दल स्थापन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जावे अशा सुचना देण्यात आल्या आहे. त्यांना कोेठेही बाहेर फिरता येणार नाही अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
नागरी कृती दलाने आलेले प्रवासी आले नाहीत ना याची खात्री करुन त्यांना स्वगृही अलगीकरण करावयाचे आहे. कंटेन्मेंट झोनमधून आल्यास त्यांचे राहते घर स्वतंत्र किंवा विलग असल्यास त्यांना स्वगृही जाण्यास अनुमती द्यावी, नसल्यास गावातील जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर, मंगल कार्यालये आदी ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करुन ठेवावे. संस्थात्मक अलगीकरण असलेल्या लोकांची बिछाना, भोजन, पाणी, शौचालय अन्य नित्याच्या गरजांची व्यवस्था कृती दलाने संबंधिताच्या नातेवाईक, सामाजिक संस्था, तरुण मंडळ, महिला मंडळ, बचत गट, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने व्यवस्था करावी. अलगीकरण केलेली व्यक्ती शहरात कोठेही फिरणार नाहीत याची दक्षता या दलाने घ्यावयाची आहे. त्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अलगीकरण केलेल्या कोणत्याही व्यक्तीस कोरोना विषाणू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणीस पाठवावे. स्वगृही अलगीकरण केलेल्या व्यक्ती किंवा कुटुंबाने कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर जावू नये. स्वतःच्या घरात सामाजिक अंतर ठेवून सर्व व्यक्तींनी रहावे. कुटुंबातील सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व हात धुण्याचा साबणाचा नियमित वापर करणे गरजचे आहे. आजारी व्यक्तीने स्वगृही सुध्दा अनावश्यक एका खोलीतून दुसर्‍या खोलीत फिरणे टाळावे. आजारी व्यक्तींचे कपडे घरगुती डिटर्जंट व ड्रायचा वापर करुन वेगळे ठेवावेत. शौचालय, घरातील वारंवार स्पर्श होणारे बेड, टेबलही वांरवार स्वच्छ व निर्जतुक करावा. कुटुंबियांनी घरात गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व मतिमंद व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती यांची काळजी घ्यावी.