रत्नागिरी:- हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शनिवारी सकाळीच पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसाच्या येण्यापूर्वी ढगांच्या गडगडाटाने पावसाची वर्दी दिली. पावसाच्या सरी कोसळताच तापमानात मोठी घट झाली.
याआधी गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी शहरी भागासह ग्रामीण भागात सर्वदूर पाऊस कोसळला. शुक्रवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. शनिवारी सकाळी पासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. आधी ढगांच्या गडगडाटाने वर्दी दिली नंतर काही कालावधीत पाऊस दाखल झाला.शहरी भागात हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दोन दिवस सतत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अंतिम टप्प्यातील हापूस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.