भल्या पहाटे मिरकरवाडा जेटीवर आगीचे तांडव

रत्नागिरी :- रत्नागिरी शहरातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरकरवाडा बंदरावर शनिवारी पहाटे आगीचे तांडव सुरू झाले. बंदरावरील दोन झोपड्यांना अचानक आग लागली आणि बघता बघता या आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत जेटीवरील 2 झोपड्या आणि 1 टेम्पो जळून खाक झाला. याशिवाय अन्य साहित्य देखील जळाले. या आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी या आगीत लाखोंची हानी झाली आहे. 

शनिवारी पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जेटीवर मासेमारी बोटीचे साहित्य ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन झोपड्याना अचानक आग लागली. या आगीने बघता बघता उग्र रूप धारण केले. अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला. या आगीत दोन्ही झोपड्या जळून बेचिराख झाल्या. याशिवाय एक टेम्पो आणी झोपडीत ठेवण्यात आलेले बोटीचे साहित्य देखील जळाले. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून आगीच्या कारणांचा शोध सुरू आहे.