रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. लाॅकडाऊनमुळे वीजग्राहकांना महावितरण कार्यालयात जाणे शक्य होत नाही. यावर पर्याय म्हणून वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाइलद्वारे ‘मिस्ड कॉल’ आणि ‘एसएमएस’ची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला कोकणवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या २३ दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील ७८५ वीजग्राहकांनी मिस्ड कॉल सुविधेचा वापर करून वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे.
प्रामुख्याने कोकणात वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या २३ दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण एक लाख ३९ हजार ७५१ तक्रारी महावितरणचे मोबाअल अॅप, वेबसाइट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे मिळाल्या. त्यापैकी ३८ टक्के म्हणजे ५३ हजार १६० तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून, तर एक हजार ५८३ तक्रारी ‘एसएमएस’ द्वारे नोंदविल्या. त्यामध्ये कोकण विभागातील ७८५ ग्राहकांचा समावेश आहे.