कोरोना मुक्त झाल्याने 8 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
रत्नागिरी:- कोरोनाची संख्या वाढणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. शुक्रवारी पाच कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांत एकूण आठ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाचे 61 रुग्ण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिलच्या शेवटी शून्यावर आलेला कोरोना बाधितांचा आकडा गेल्या 14 दिवसांत तब्बल 77 वर पोहचला आहे. मात्र यातही आता दिलासादायक बाब म्हणजे दोन दिवसांत 8 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज (शुक्रवार) आणखी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये तीन दापोली तालुक्यातील तर दोन संगमेश्वर तालुक्यातील रुग्ण आहेत. त्यामुळे आता ऍक्टिव्ह म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 61 वर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 आहे. तर यापूर्वी 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आता पुन्हा 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात 61 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण कोरोनावर मात करत असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.